Friday 9 September 2011

चालत होतो अनवाणी मी....


आयुष्याच्या वाटेवरती
चालत होतो अनवाणी मी,
सुकलेल्या त्या झऱ्याजवळही
 मागत होतो पाणी मी...

रुक्ष किनारा शुष्कचि सगळे
भासत होते मृगजळ दुरुनी,
सुकलेल्या त्या फुलांकडूनही
मागत होतो सुगंध मी...

निपचित अशा त्या पाषाणांशी
हितगुज मनीचे केले मी,
रातराणीला पाहण्यासाठी
दिवसा जागत होतो मी...

अश्रू जरी आले हृदयातुनी 
हसुनि  पुसुनि टाके मी,
आशेच्या फुलपाखरासोबती
चालत होतो अनवाणी मी.. चालत होतो अनवाणी मी....




[Image courtesy : http://www.flickr.com/photos/jason_burmeister/ ]

Friday 2 September 2011

पण.. कधी बोललोच नाही..

तिचे डोळे, त्यातील भाव
शांतशा सागरातील, छोटीशी नाव 
आवडायचे मला, पण.. कधी बोललोच नाही..

तिचे हसणे, तिची खळी
रोज नव्याने उगवणारी, नाजूकशी कळी
आवडायचे मला, पण.. कधी बोललोच नाही..

तिचे येणे , तिचे असणे
जणू मंद स्वरातील अलगद गाणे
आवडायचे मला, पण.. कधी बोललोच नाही..

तिचे रुसणे, तिचा राग
तिच्या लाडिक स्वभावाचा तोही लाडिकसा भाग
आवडायचे मला, पण.. कधी बोललोच नाही..

हृदयात माझिया या, चित्र तिचेची होते
हरवेन तेही, या भीतीने..
कधी  बोललोच नाही.. कधी बोललोच नाही.....   



- कवी आमोद