Wednesday 6 July 2011

त्या आठवणी [माझी काव्यरचना: १]


                                               शीर्षक : "त्या आठवणी "
संकल्पना: कवितेतील नायक कळत नकळत एका व्यक्तीत गुंतला गेला.. स्वतःला त्याने त्या व्यक्तीशी जोडून घेतले, अन कालांतराने समोरील व्यक्तीकडून मिळणारे प्रतिसाद तुटक , बदललेला असल्याचे त्याच्या लक्षात येऊ लागले.. पण आता तो त्याच्या बाजूने एवढा गुंतला गेला होता, कि त्याला या सगळ्यातून बाहेर पडून नेहमीप्रमाणे राहणे त्याला अशक्य होऊ लागले. एक प्रचंड अशी पोकळी त्याच्या मनात, आयुष्यात निर्माण झाली.. आणि याच अवस्थेत त्याच्या भावना खालील कवितेत व्यक्त होत आहेत.
[कवितेतील शब्दांपलीकडे दडलेला खोल अर्थ शोधण्यास रसिकांस नक्कीच छान वाटेल ]

नाही नाही म्हणतानाही
येऊन जाती त्या आठवणी |
नव्या ऋतूतील नव्या दिनीही
जुन्या ऋतूतील जुनीच गाणी ||

मनी नव्हते गीत करावे
गद्यातही जाई मी रमुनी |
वसंतासही त्या खुद्द न ठावे
काय लिहितसे पानोपानी ||

मन हे वेडे गुंतत गेले
जणू ती हलक्या श्रावणसरी |
घर इवलेसे बांधुनी ठेले
वाट पहात ते उभे दारी ||

शून्यामधुनी शून्य जाउनी
पाठीमागे शून्य उरावे |
का तिचाची विरह होऊनी
गीत तिचेची ओठी स्फुरावे ||

~कवी आमोद

Friday 1 July 2011

आपले मन...
    एक अजब रसायन, एक गुंतागुंतीची रचना, प्रकाशालाही मागे टाकेल इतके वेगवान, क्षणाक्षणाला रूप बदलणारे मृगजळ... सर्वांमध्ये असताना एकटे ठेवू शकणारे आणि एकटं असतानाही सर्वांमध्ये असल्याची जाणीव देऊ शकणारे.. चांगले असले तर माणसाला देवही बनवू शकणारे अन बिघडले तर मानवातच पशू निर्माण करू शकणारे... कधी खूप गप्पा मारणारे, तर कधी 'Leave me alone' म्हणणारे.....
   या मनाचा गुंता ज्याला समजला आणि तो ज्याने सोडविला तो सुखीच म्हणायला हवा.

हेच मन कधी कधी खूप हळवं होता, याच मनाला कधी खूप खूप बोलावसं वाटतं आणि मग शोध सुरु होतो, आपल्या मनीच्या भावनांना जागा देऊ शकणार्‍या एखाद्या दुसऱ्या मनाचा, दुसऱ्या हृदयाचा.. मग ती जागा कधी आई-वडील भरून काढू शकतात, कधी मित्र-मैत्रीण तर कधी भाऊ-बहीण..... पण या सर्वांच्याही पलीकडे एक पोकळी उरून राहते, जिला भरणे खूप कठीण असते.

अशाच काही गोष्टींसाठी मनाला व्यासपीठ मिळावे, म्हणून हा ब्लॉगप्रपंच !!
वेळोवेळी सुचणाऱ्या कविता, कधी काळी मनानेच काढलेली आपली समजूत, कधी शिकविलेले तत्वज्ञान, तर कधी अशाच आपल्या गप्पा..  : )  आणि ज्या भाषेतून विचार करतो, त्यातूनच व्यक्त झालेले उत्तम, म्हणून खास मराठी भाषेची निवड : )

काही काळाने मागे वळून बघितल्यावर या सर्व गोष्टी नक्कीच मार्गदर्शन करतील असे मला वाटते..

पहिल्याच ब्लॉगचे पहिले लिखाण इथेच थांबवतो.. पण एक गोष्ट मात्र नक्की, आत्ता मारलेल्या एवढ्याशा गप्पाही माझ्या मनाला उदासीनतेतून काढून आनंद देण्यात यशस्वी झाल्यात  : D

आपलाच जवळचा मित्र,
आमोद गोखले