Wednesday 6 July 2011

त्या आठवणी [माझी काव्यरचना: १]


                                               शीर्षक : "त्या आठवणी "
संकल्पना: कवितेतील नायक कळत नकळत एका व्यक्तीत गुंतला गेला.. स्वतःला त्याने त्या व्यक्तीशी जोडून घेतले, अन कालांतराने समोरील व्यक्तीकडून मिळणारे प्रतिसाद तुटक , बदललेला असल्याचे त्याच्या लक्षात येऊ लागले.. पण आता तो त्याच्या बाजूने एवढा गुंतला गेला होता, कि त्याला या सगळ्यातून बाहेर पडून नेहमीप्रमाणे राहणे त्याला अशक्य होऊ लागले. एक प्रचंड अशी पोकळी त्याच्या मनात, आयुष्यात निर्माण झाली.. आणि याच अवस्थेत त्याच्या भावना खालील कवितेत व्यक्त होत आहेत.
[कवितेतील शब्दांपलीकडे दडलेला खोल अर्थ शोधण्यास रसिकांस नक्कीच छान वाटेल ]

नाही नाही म्हणतानाही
येऊन जाती त्या आठवणी |
नव्या ऋतूतील नव्या दिनीही
जुन्या ऋतूतील जुनीच गाणी ||

मनी नव्हते गीत करावे
गद्यातही जाई मी रमुनी |
वसंतासही त्या खुद्द न ठावे
काय लिहितसे पानोपानी ||

मन हे वेडे गुंतत गेले
जणू ती हलक्या श्रावणसरी |
घर इवलेसे बांधुनी ठेले
वाट पहात ते उभे दारी ||

शून्यामधुनी शून्य जाउनी
पाठीमागे शून्य उरावे |
का तिचाची विरह होऊनी
गीत तिचेची ओठी स्फुरावे ||

~कवी आमोद

1 comment: